

बेळगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर उस उत्पादक शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत. यात हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रतिटन किमान ५,५०० रुपये दर निश्चित करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेतर्फे गुरूवारी (दि.२४) बेळगाव येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून पिकांना उत्पादन खर्चाच्या आधारे शास्त्रीय व योग्य दर द्यावा. तसेच कृषीमालाच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून किमान आधारभूत किमतीचे धोरण अधिक प्रभावी करावे, घरगुती वापरासाठी साखरेची किंमत ५० रुपये किलो आणि व्यावसायिक वापरासाठी १०० रुपये किलो निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी नेते चुनाप्पा पुजेरी म्हणाले, कर्नाटकात इथेनॉलच्या उत्पादन व विक्रीला पूर्ण परवानगी द्यावी. सर्व कृषी उपक्रमांचा ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत समावेश करावा. २०२५-२६ मध्ये कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना साखरेच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर प्रतिटन अतिरिक्त ३०० रुपये देण्यात यावेत. या आंदोलनात महाराष्ट्रासह अन्य विविध भागातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. यावेळी राज्य मानद अध्यक्ष शशिकांत गुरुजी, किशन नंदी, राष्ट्रीय नेते प्रकाश नायक, राजेंद्र गड्याण्णवर, प्रेम चौगला, शिवानंद मुगाळीहाल व अस्मा जुटदार आदी उपस्थित होते.
एकजूट महत्त्वाची
ऊस दर आंदोलनसाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात लढा देण्याची गरज आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी गुर्लापूर येथे २८ रोजी शेतकर्यांची बैठक बोलावली आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे मतभेद विसरून सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावे. त्यामुळे आपल्या लढ्याल बळ मिळेल, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.