पुणेः पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले. Pudhari photo
कोल्हापूर

Maharashtra graduate teacher constituency election results | अजित पवार गटासह ठाकरे गटालाही भोपळा

पदवीधर, शिक्षक निवडणूक - महायुती दोन तर मविआ तीन जागांवर विजयी, नागपूरमध्ये अभिजित वंजारी यांना कराळे मास्तरनी तारले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सेंट्रल डेस्क

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी प्रत्येकी १ तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दोन जागा जिंकल्या. नागपूर पदवीधरमध्ये विजय मिळवून काँग्रेसने आपला मतदार संघ कायम राखला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना भोपळाही फोडता आला नाही.

या निवडणुकीत भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघांत आपले वर्चस्व सिद्ध केले. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात पुणे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदार संघात उमेदवार उभे केले. पण तिन्ही ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पराभूत केले

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांनी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यासह माजी आमदार दत्ता सावंत यांचाही पराभव केला. त्यामुळे या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांना २३,११७ मते मिळाली. शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना १६,३४७ मते मिळाली असून, सानप दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना ८,९६५ मते मिळाली. तर, राष्ट्रीय समाज पक्षाचे दत्ता सावंत यांना १२,६८७ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ५१,५०० मते वैध ठरली होती. तर १,६७३ शिक्षकांची मते अवैध ठरविण्यात आली.

पहिल्या पसंतीच्या मतांचा विजयासाठी आवश्यक कोटा २५,७५६ निश्चित करण्यात आला होता. परंतु, कोणत्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये सर्वाधिक मते मिळवणारे भाजपचे कौस्तुभगावडे विजयी ठरविण्यात आले. विजयानंतर कौस्तुभगावडे म्हणाले, 'हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई सुरू केल्यापासून मी माझे जीवन शिक्षकांना अर्पण केले आहे.

शरद पवार गटाचे दोन उमेदवार विजयी

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पराभूत केले. शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप घुगे चौथ्या क्रमांकावर गेल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांनी लक्षवेधी मते घेतली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख यांना पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. दुसऱ्या पसंदीच्या मतांवर त्यांनी विजय मिळवला. हर्षदा देशमुख आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात अटीतटीची लढत झाली.

अमरावतीत सरनाईक यांची बाजी

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक विजयी झाले. सरनाईक यांनी मतमोजणीत १६ हजार १३४ मतांचा विजयाचा कोटा पूर्ण करीत त्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांच्यावर मात केली. या मतदारसंघात शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दत्तात्रय लहाने यांचाही सामना होता.

नागपुरात काँग्रेसचा भाजपला धक्का

नागपूर : नागपुरात तब्बल ३६ तास उलटूनही नागपूरचा पदवीधर आमदार कोण होणार, हे स्पष्ट होत नव्हते मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांवर भाजपच्या सुधाकर कोहळे यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी धोबीपछाड दिली. पहिल्या फेरीत काँग्रेसने तर दुसऱ्या फेरीत भाजपने आघाडी घेतली. कोहळे यांनी पाच हजारांची मिळविलेली आघाडी वंजारी यांनी शेवटच्या टप्प्यात भरून काढत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्यावरही २६ हजारांवर मते घेणारे नितेश कराळे मास्तर यांची भूमिका यात महत्त्वाची ठरली. अर्थातच, याचा अॅड. अभिजित वंजारी यांना मिळाला.

अर्थातच, नागपूरचा निकाल कराळे मास्तर, त्यांना मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते यामुळे फिरला. एकसंध काँग्रेस, आणि ४८ संघटना आपल्यासोबत असल्याने विजय आमचा निश्चित होता. माझा विजय झाला आहे. 'जो जिता वही सिकंदर...' ६ वर्षे मी काम केले. शक्तीपेक्षा युक्त्ती श्रेष्ठ यावर आम्ही भर दिला, अशी प्रतिक्रिया अभिजित वंजारी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT