महागाव येथे शनिवारी सायंकाळी घरगुती गॅस सिलेंडरमधून झालेल्या गॅसगळतीमुळे प्रचंड स्फोट झाला. या भीषण घटनेत घराचे आणि प्रापंचिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने सर्व कुटुंबीय बाहेर असल्यामुळे जीवितहानी टळली.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुनील बाबुराव खटावकर यांच्या घरी हा स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की घरातील दरवाजे उचकटून बाहेर फेकले गेले. खिडक्यांचे ग्रील व स्लाइडिंग तुटून 100 ते 150 फूट अंतरावर जाऊन इतर गल्लीमध्ये पडले.
स्फोटाच्या वेळी घरातील सर्व सदस्य गल्लीतील "दि युथ सर्कल"च्या गणपतीच्या महाआरतीला गेले होते. आरती संपवून घरी परतताना त्यांना स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. घर रिकामे असल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले.
स्फोटामुळे घरातील सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाल्याचा भास झाला. या घटनेनंतर महागावमध्ये विशेषतः महिलांमध्ये गॅस सिलेंडर वापराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा पंचनामा महागाव बीट हवालदार गायत्री नाईक, मंडल अधिकारी आर. के. तोळे, ग्राम महसूल अधिकारी जयश्री चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, पोलीस पाटील प्रदीप कांबळे तसेच व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.