Bambavde Saidapur Leopard Attacks Goat
बांबवडे : बांबवडे परिसरात बिबट्याचा वावर कायम असतानाच सैदापूर (ता. शाहूवाडी) येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात कुमार कांबळे यांच्या मालकीची शेळी गंभीर जखमी झाली आहे.
सैदापूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही बांबवडे परिसरात बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता सैदापूर येथे शेळीवर हल्ला झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करून नागरिक तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, बिबट्यांचा वावर लक्षात घेता रात्रीच्या वेळी नागरिकांनी आणि पशुपालकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.