दिगंबर सुतार
म्हासुर्ली : धामणी खोरे परिसरात गव्यांच्या वाढत्या वावरामुळे आधीच शेतकऱ्यांचे हाल झाले होते, आता या भागात बिबट्याची चाहूल लागल्याने भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. गवा आणि बिबट्यांच्या एकत्र दहशतीमुळे डोंगरपायथ्यावरील गावांतील नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर पडायलाही घाबरत आहेत. नुकताच कावळटेक येथे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून, त्याने शेतकऱ्याच्या बैलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
गव्यांचा आणि बिबट्याचा वाढता वावर
राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा या तीन तालुक्यांत पसरलेले धामणी खोरे हे बहुतांश जंगलांनी व्यापलेले क्षेत्र आहे. हे क्षेत्र थेट दाजीपूर अभयारण्याशी जोडलेले असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नैसर्गिक वावर नेहमीच असतो. गवे, सांबर, भेकर आणि विविध प्राण्यांचे अधिवास या जंगलात आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून माणवी हस्तक्षेप आणि उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम झाला आहे.
पूर्वी फक्त जंगलात दिसणारे गवे आता थेट शेतशिवारांत येऊन पिकांची हानी करत आहेत. शेतकऱ्यांना गव्यांकडून पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, पण जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ते दबकतच शेती करत आहेत. त्यात आता बिबट्याचा वावर दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकांमध्ये वाढली भीती
मागील दोन वर्षांत या परिसरात पाळीव जनावरांवर आणि कुत्र्यांवर बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. नुकत्याच झालेल्या घटनेत कावळटेक येथील शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. तसेच वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्ट दिसत आहे.
बिबट्या हा स्थिर राहणारा प्राणी नसल्याने तो वारंवार शेतशिवार, उसशेती किंवा गावाशेजारील शेलवड्यांत फिरताना दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतावर जाणे म्हणजे धोका पत्करणे झाले आहे. अनेकांनी शेतीची कामे दिवसा आटोपून रात्री बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.
धामणी खोऱ्यातील जरगी (ता. गगनबावडा) आणि बाजारीवाडा (ता. राधानगरी) परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर केलेल्या हल्ल्यांच्या घटना अलीकडेच घडल्या आहेत. यामुळे बिबट्यांची संख्या वाढतेय हे स्पष्ट झाले आहे.
कामगारांसाठी धोकादायक परिस्थिती
या भागातून जाणारे दोन रस्ते जंगलातूनच जातात. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने पद्मश्री डी.वाय. पाटील साखर कारखान्यातील कामगार वर्ग रात्री अपरात्री प्रवास करत असतो. बिबट्याच्या अस्तित्वामुळे या कामगारांवर अक्षरशः ‘टांगती तलवार’ लटकली आहे.
लोकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला पकडावे आणि दुसरीकडे सोडावे अशी मागणी होत आहे. मात्र, धामणी खोरे हा राखीव जंगल क्षेत्र असल्याने वनविभागासमोरही मर्यादा आहेत. त्यामुळे सध्या लोकांनीच अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन वनअधिकाऱ्यांनी केले आहे.