विशाळगड : सुभाष पाटील : वनसंपत्तीची मोठी पर्वणी सह्याद्रीच्या रांगेतील शाहूवाडीला लाभली आहे. डोंगरची मैना, 'काळी मैना आणि खायला फैना' अशी आरोळी ऐकली की, करवंदाची चव चटकन ओठावर येते आणि आपसूकच त्या माणसाला थांबवून त्याच्याकडून करवंदे घेतली जातात. जांभूळ, कोकम, मध, फणस ही शाहूवाडीची आणखी एक खासियत. मात्र, या ठिकाणी एकही प्रक्रिया उद्योग उभारला नसल्याने डोंगरची मैना अद्याप जगभर पोहोचलेली नाही.
शाहुवाडीत रानमेव्याबरोबरच कडीपत्ता, तमालपत्र, आवळा, चिंच, कैऱ्या आदी वनसंपदा मुबलक आहे. बहुतांशी भाग डोंगराळ असल्याने शंभर टक्के अनुदान योजनेतून आंबा, काजू, चिकू, पेरू, मोरआवळा, काळी मिरी, स्ट्रॉबेरी आदींच्या बागा गेल्या दहा वर्षात वाढल्या आहेत. 'उदय' आणि 'विश्वास' असे दोन साखर कारखाने येथे आहेत. धरणे, लघु पाटबंधारे प्रकल्पाद्वारे पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा ऊस क्षेत्र वाढविण्याकडे कल असला तरी डोंगरी रचनेमुळे उत्पादन मात्र वाढताना दिसत नाही. पश्चिम भागात तर जंगली प्राण्यांच्या नुकसानीमुळे पिकांचा खर्च परवडत नाही.
साखर उद्योग वगळता बॉक्साईट प्रकल्प, तुरटी प्रकल्प आणि एमआयडीसीची घोषणा निवडणुकी पुरत्या ठळक होताना दिसतात. तुटपुंजी शेती, उच्च शिक्षणाचा अभाव यामुळे दहावीतून बाहेर पडणारा तरुण मुंबई, पुण्याची वाट धरताना दिसतो. चाकरमान्यांच्या मनी ऑर्डरवर येथील अनेक पिढ्यांचा प्रवास होत आहे. जंगलाशी संलग्न नि डोंगरी भागातील शंभरावर धनगरवाडे केवळ वनसंपदेवर चरितार्थ चालवितात. रानमेव्याच्या सुगीत डोंगरात राहणारी वस्ती रानमेवा गोळा करून स्थानिक बाजारपेठासह कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, सांगली या परिसरात विक्री करून वर्षभराची पुंजी जमवण्यास बाहेर पडते. रानमेव्याची सुगी वगळता दुर्गम वस्त्या, दळणवळणाचा अभाव, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधांच्या फेऱ्यात अडकलेल्या डोंगरी लोकांना स्वयंरोजगाराकडे वळवायचे असेल. तर फळ प्रक्रिया करणारे उद्योग या मागास भागात सुरू होण्याची गरज आहे.
मुबलक स्वरूपातील कच्चा माल, मनुष्यबळ, संलग्न असलेल्या बाजारपेठा पाहता आंबा, काजू , करवंदे, जांभूळ, फणस, कोकम, आवळा, लिंबू, यावर प्रक्रिया करून सरबत, जाम, जेली, वेफर्स, भुकटी (चूर्ण), च्यवनप्राश, लोणची, मुरांबे, कँडी, सुपारी, किसमिस आदी पदार्थ बनवणारे उद्योग उभारण्यास येथे मोठी संधी आहे. औषधी उद्योगाला फळ प्रक्रियेशिवाय वृक्षतेल बियापासून निलगिरी, हिरडा तसेच तमालपत्र, शिकेकाई यावर प्रक्रिया उद्योगांना संधी आहेत. कोकण आणि घाट यांचा दुवा साधणारा हा भाग कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यावर आहे. येथील महिला उद्योजकता व पर्यटन विकासाला जोड देणारा प्रक्रिया, औद्योगिकरण नवा दृष्टिकोन या भागात रुजेल. हिरडा या फळावर प्रक्रिया करून पावडर निर्मितीचा टॅनिन प्रकल्प आंबा या दुर्गम ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू करून यशस्वी केल्याचे उदाहरण समोर आहे. आजही दीडशे कामगार येथे कार्यरत आहेत.
गेल्या वीस वर्षांपूर्वी पुणे येथील प्रगत शेतकरी बाळासाहेब टेकावडे यांनी उजाड डोंगरावर प्रथम कॉपी आणि नंतर चहाची यशस्वी लागवड करून स्वतःचा चहा पावडर प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. तसेच याच तालुक्यातील निळे गावच्या अशोक कुंभार या सुशिक्षित पदवीधर युवकाने आपल्या रानात दहा गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग मोठ्या जिद्दीने केला. त्यामुळे सुशिक्षित बेकार तरुणाई यांची सांगड घालणारे प्रक्रिया उद्योग भविष्यात येथे उभे राहिले, तर शहरात कामधंद्याच्या शोधात जाणाऱ्या तरुणाईची मानसिकता बदलेल. आंबा, विशाळगड, गजापूर, येळवण जुगाई, पावनखिंड, बर्की, करंजफेण, अनुस्कुरा, धोपेश्वर पठार, उदगिरी आदी जंगल परिसरातील धनगर समाजाचे मनुष्यबळ येथे उपलब्ध असल्याने ही ठिकाणे प्रक्रिया उद्योगाला संधी देणारे आहेत.
हेही वाचा