कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड शहर व परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. पालिका चौकात, शाहूराजे चौक, पालिका सभागृह, शेत, शिवारात नागरिक, शेतकऱ्यांनी 100 सेकंद स्तब्धतारुपी वंदनाने राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. पालिका प्रशासनाने स्तब्धतेसाठी प्रारंभी 10 सेकंद भोंगा वाजवला 100 सेकंदानंतर भोंगा वाजवून अभिवादन केले. चौकात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणले. "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व" अंतर्गत 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते.
पालिका चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले होते. राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी मुलांना सक्तीचे शिक्षण देऊन शैक्षणिक सक्षम करण्यासाठी सर्व धर्मीयांचे बोर्डिंग कोल्हापूर येथे सुरु करून ज्ञानगंगा निर्माण करण्याचे महानकार्य केले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. या शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राधानगरी धरणाची निर्मिती केली. आजही या धरणामुळे अनेक एकर शेती हिरवीगार होते. म्हणूनच राजर्षी शाहू महाराज हे लोकराजा आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, अरुण आलासे, बाबा सावगावे, गौतम ढाले, दयानंद मालवेकर यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा जागर केला.
शिवसेना कार्यालय, सकल मराठा कार्यालय, मराठा समाज मध्यवर्ती कार्यालय मुस्लिम सेंट्रल कमिटी, अबू-हुरैरा मदरसा, शाहूराज विचार मंच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, मुस्लिम जमाअत सामाजिक संस्था, बिरदेव मंदिर भैरववाडी, दयावान तालीम मंडळ, एस के पाटील, दत्त महाविद्यालय, शाहू पतसंस्था, विविध बँक, शेतात काम करणारे मजूर आणि यंत्रमाग व्यावसायिकांनी यंत्रमाग बंद ठेवत राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून 100 सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शशिकांत पाटील, सुरेश बिंदगे, जयपाल बलवान, स.ग सुभेदार, धोंडीराम चौगुले, आप्पासाहेब बंडगर, सुनील कांबळे, नंदकुमार चौधरी, कुदरत भुसारी, दीपक कांबळे अखिल गोलंदाज, अनुप मधाळे, जय कडाळे, सुरेश कांबळे, सुधीर माने, वैशाली जुगळे, राजश्री मालवेकर आदी शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा :