गणपतीपुळे/हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील इरफान झाकीर हुसेन जमादार (वय ३४) या तरुणाचा गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी फोटो काढत असताना मोठ्या लाटेबरोबर समुद्रात ओढला गेल्यामुळे मृत्यू झाला. इरफान हा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गणपतीपुळे येथे आला होता. बुधवारी दुपारी ते सर्वजण आरे-वारेमार्गे पुन्हा कोल्हापूरला जात असताना भंडारपुळे येथील एका हॉटेलजवळ तो समुद्रकिनारी सेल्फी काढण्यासाठी उभा होता. तेव्हा अचानकपणे आलेल्या एका मोठ्या लाटेमध्ये इरफान पाण्यात ओढला गेला. (Ganpatipule Sea Accident)
त्याच्या मित्र -मैत्रिणींनी आरडाओरढा केला. तो ऐकून स्थानिकांनी पाण्यात उड्या घेत इरफानला पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इरफानला मृत घोषित केले. इरफान हा सेंट्रिंगचे काम करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू असल्याने त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे पत्नी व मुले असा परिवार आहे.