Kagal Woman Death
कागल: कागल शहरातील लोहार गल्ली येथील जुन्या दिवाणवाड्याची पावसाने भिंतीसह छप्पर अंगावर कोसळल्यामुळे झोपलेल्या उर्मिला उदय कुलकर्णी (वय ३७) यांचा मातीच्या ढिगार्याखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
दैव बलवत्तर म्हणून बाजूलाच मोबाईलवर गेम खेळत असलेला तेरा वर्षांचा मुलगा घाबरून उडी मारून बाहेर पडला म्हणून वाचला. नगरपालिकेच्या वतीने रात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पालिकेच्या वतीने सर्व्हे करण्यात आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये या वाड्याचा समावेश नसल्याचे समजते.
उर्मिला जेवण करून भिंती लगतच असलेल्या लोखंडी कॉटवर झोपलेल्या होत्या. तर मुलगा दिगंबर उदय कुलकर्णी (वय १३) हा बाजूलाच असलेल्या कॉटवर मोबाईलवरील गेम खेळत होता. अचानक मोठा आवाज झाला आणि पावसाने भिजलेली पांढऱ्या मातीची भिंत छपरासकट खाली कोसळली.
कोसलेल्या मातीच्या ढिगार्याखाली उर्मिला सापडल्या. त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात माती, लोखंडी पत्रे, खापऱ्या, वासे पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बाजूलाच राहणाऱ्या रहिवाशांनी धाव घेतली. अंधारात कोठे कोण पडले आहे हे समजून येत नव्हते. पालिकेमध्ये रोजंदारीवर काम करीत असलेले उदय कुलकर्णी हे घरकुलामध्ये मुक्कामास गेल्यामुळे वाचले.
याबाबतची घटना समजतात रात्री नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मुख्याधिकारी अजय पाटणकर, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मातीचे ढिगारे बाजूला काढून काढले
दरम्यान, बाजूच्या खोलीमध्ये झोपलेले उदय कुलकर्णी, यांचे भाऊ उमेश आणि त्याचे कुटुंबीय यांना मातीचा ढिगारा बाजूला काढून सुरक्षित रित्या बाहेर काढले. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. पालिकेने मध्यंतरी धोकादायक इमारती बाबत नागरिकांना आवाहन केलेले होते. तरी देखील या आवाहनाकडे दुर्लक्ष करून राहत असल्याने दुर्दैवी घटना घडली.