कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
अनेक वर्षांपासूनचे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून होणाऱ्या या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे पावणेदहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या मार्गाला अखेर चालना मिळाली आहे.
विधानभवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली, या बैठकीत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असेही आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी आहे. या सर्वांचा विचार करता, २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे.
'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. जाधव यांचा पाठपुरावा
कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गासाठी दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला. चार दशकांची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांची ही जिव्हाळ्याची मागणी तडीस नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दै. 'पुढारी'चा ३ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापुरात अमृतमहोत्सवी सोहळा झाला होता.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देणार असल्याची घोषणा करत, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी ३,२४४ कोटी रुपयांच्या मार्गाला मंजुरी दिली. त्यापैकी केंद्र शासनाच्या १,३७५ कोटी रुपयांची तरतूदही केली होती. यानंतरही डॉ. जाधव यांनी सातत्याने या मार्गाबाबत पाठपुरावा केला.
असा आहे प्रकल्प
एकूण लांबी : १०७.६५ कि.मी.
भूसंपादन : ६३८.६
हेक्टर खर्च: ५,००० कोटी (अंदाजे)
२७ बोगदे, ५५ उड्डाणपूल या मार्गावर
२८ कि.मी. लांबीचे एकूण २७ बोगदे असतील. यासह रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे, सर्वात मोठा बोगदा ३.९६ कि.मी. लांबीचा आहे. २ कि. मी. पेक्षा जादा लांबीचे ३, तर त्यापेक्षा कमी लांबीचे २४ बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल, रस्त्याखालील ६८ पूल असतील. यासह छोटे पूल ७४, तर मोठे पूल ५५ असतील. या मार्गावर एकूण दहा स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.