

कोडोली : पन्हाळा तालुक्यातील काखे येथील तरुणाची वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी बाळकृष्ण अहिर (रा. वाळवा, जि. सांगली) याच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काखे येथील राजश्री संभाजी पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी राजश्री पाटील आणि शिवाजी अहिर हे एकाच गावात राहत असल्याने त्यांच्यात ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत अहिर याने पाटील यांच्या मुलाला वन विभागात नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी 18 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्याने 2022 पासून टप्प्या-टप्प्याने ही रक्कम स्वीकारली. दीर्घकाळानंतरही मुलाला नोकरी न मिळाल्याने पाटील यांनी दिलेल्या रकमेबाबत मागणी केली असता, देण्यास नकार दिल्याने पाटील यांनी फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.