Kolhapur Rain Update
धामोड : धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी प्रकल्प ७७ टक्के भरला असून धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातून प्रतिसेकंद ५०० क्युसेक ने पाणि नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
तुळशी धरण परिसरात २३ मेपासून आज अखेर २४०० मी मी इतका पाऊस झाला आहे. तर गेल्या चोवीस तासांत ७० मी मी इतका पाऊस झाला असल्याने धरण पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवडयात ७७ टक्के भरले आहे. धरणाची पूर्ण संचय पातळी ६१६. ९१ मीटर असून धरणाची सद्याची पातळी ६१२.२७ इतकी आहे. या परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे.
तुळशीतून पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. तुळशी नदीवरील बीड बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.