Kolhapur Theft News
बांबवडे: बांबवडे ता. शाहूवाडी येथील मुख्य बाजारपेठेत, भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालत तब्बल ७ मोबाईल फोन आणि ४ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह मोटार सायकल लंपास केली. भरदिवसा बाजारपेठेत घडलेल्या या सलग चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे पोलीस प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे.
गुरुवार हा आठवडी बाजार आणि खरेदीचा दिवस असल्याने बांबवडे बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणांहून ७ जणांचे मोबाईल लांबवले, तर ४ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवरही डल्ला मारला. तसेच शनिवारी बाजार पेठेतून मोटर सायकलची चोरी झाली. यामुळे बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांबवडे व परिसरात पाकीटमारी, मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र, या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी बाजारपेठेत गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी आणि भुरट्या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.
बाजारपेठेत चोरीच्या घटना घडल्यानंतर संबंधित नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असता, थेट गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. 'मोबाईल हरवला असेल' किंवा 'शोध घ्या' अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने फिर्यादी हतबल झाले आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे भुरट्या चोरांचे चांगलेच फावले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथे राहत्या घराच्या छताची कौले काढून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगल अशोक संकपाळ (वय ४०, व्यवसाय शेतमजुरी, रा. मंगराया मंदिराजवळ, तेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांच्या घरी ही घरफोडी झाली. याप्रकरणी त्यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या छतावरील कौले काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी तिजोरी फोडून त्यातील चार ग्रॅम वजनाची अष्टपैलू मण्यांची सोन्याची माळ (किंमत २८ हजार रुपये), तीन ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची साखळी (किंमत २१ हजार रुपये) आणि सहा हजार रुपये रोख, असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील तपास करीत आहेत.