कोल्हापूर

कोल्हापूर: गारिवडे – बावेली येथील धामणी नदीवरील माती बंधारा फुटला

अविनाश सुतार

म्हासुर्ली: पुढारी वृत्तसेवा :  गारिवडे – बावेली दरम्यान धामणी नदीवर बांधलेला मातीबंधारा पाण्याच्या दाबाने फुटला आहे. यात शेतकऱ्यांच्या पैशांच्या हानीबरोबर श्रमही वाया गेले आहे. पण जगण्याला आधार म्हणून जो पाणीसाठा केला होता, तोच वाया गेल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीची तहाण भागणार कशी? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

शेतकर्‍यांनी लाख रुपये खर्च करून बांधलेला बंधारा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा या बंधाऱ्यात पाण्याचे पुनर्भरण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांवर पाण्याचे मोठे संकट कोसळते. धामणी खोऱ्यात पाणीटंचाईचा भार हलका होण्यासाठी शेतकरी नदीवर मातीबंधारे बांधतात. बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्यावर येथील लोकांचा अर्धा अधिक उन्हाळा सुसह्य होत असतो. पण केवळ मातीतच बांधलेले हे बंधारे कधी कधी पाण्याच्या अतिरिक्त दाबाने डळमळीत होतात. डळमळीत झालेले बंधारे फुटुन जातात. अशा घटना वारंवार घडत असतात. गतवर्षी असाच बळपवाडी – पाटीलवाडी दरम्यानचा बंधारा पाण्याच्या दाबाने फुटुन गेला होता.

धामणी नदीवर सात ते आठ ठिकाणी मातीबंधारे बांधलेले आहेत. त्यापैकीच नदीच्या वरच्या टप्यातील गारीवडे – बावेली दरम्यानचा हा बंधारा फुटल्याने येथील पाच सहा गावांसमोर पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. शिवाय नदीच्या खालील टप्यातील शेतकरीही या घटनेने धास्तावला आहे. फुटलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचा दाब खालील बंधाऱ्यांवर पडून बंधारे डळमळीत होवू नयेत, म्हणून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी शेतकर्‍यांची पळापळ चालू झाली आहे.

पाण्याअभावी धामणी खोऱ्यातील शेतीची मोठी होरपळ होत असते. त्यातच तुटपुंजा पाणीसाठा का होईना म्हणून जे बंधारे बांधावे लागतात. त्यात लोकांचीही होरपळ होते. बांधलेला बंधारा ज्यावेळी फुटतो त्यावेळी मात्र लोकांना परिस्थिती समोर हतबल व्हावे लागते. हे अनेक वर्षांचे दुष्टचक्र आहे. यातून मुक्त होण्यासाठी धामणी प्रकल्पाचे पूर्णत्वाकडे जाणे गरजेचे आहे.
मनोज देसाई, सामाजिक कार्यकर्ते, गारिवडे

'दै. पुढारी'तील वृत्ताची चर्चा

पाण्याच्या दाबाने डळमळीत होऊन बंधारा फुटीच्या घटना कधी कधी घडत असतात. यात शेतकऱ्याला मोठ्या हानीला सामोरे जावे लागते. याबाबत नुकतेच या कटुप्रसंगा बाबत 'दै. पुढारी'तून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या बातमीची चर्चा सर्वत्र होत होती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT