कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर व वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. रोज अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र अलीकडे काही भाविक तोकडे व अपारंपरिक कपडे घालून मंदिरात येत असल्याचे देवस्थान व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांनी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मंदिरात येताना भाविकांनी पारंपरिक व सभ्य कपडेच परिधान करावेत.
मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. येथे येणाऱ्या भाविकांनी देवतेप्रती आदर बाळगून शालीन व पारंपरिक कपडे परिधान केले पाहिजेत.
पुरुषांनी – फुल पँट, शर्ट किंवा पारंपरिक पोशाख
महिलांनी – साडी, चूडीदार, सलवार-कुर्ता इत्यादी सभ्य व पारंपरिक कपडे वापरावेत.
देवस्थान समितीच्या माहितीनुसार, मंदिरात काही वेळा अशा व्यक्ती येतात जे अत्यंत टाइट, फॅन्सी किंवा तोकडे कपडे घालतात. त्यामुळे मंदिरातील पवित्रता आणि भक्तीच्या वातावरणात व्यत्यय येतो.
त्यामुळे अशा कपड्यांना आता पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. कोणताही भाविक तोकड्या पोशाखात आढळल्यास त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात येऊ शकतो.
देवस्थान समितीने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की त्यांनी ही सूचना गांभीर्याने घ्यावी व देवस्थानच्या सन्मानासाठी व पवित्रतेसाठी या नियमाचे पालन करावे. आपली श्रद्धा व भक्ती शालीन व योग्य वागणुकीतून व्यक्त व्हावी, हाच हेतू आहे.