कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षीच्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यावर्षीच्या उसाला ३५०० रूपये द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार हेरवाड (ता. शिरोळ) येथे सलगर-सदलगा राज्य मार्गावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको करत 'चक्काजाम' आंदोलन केले.
हेरवाड गावातील मुख्य चौकात राज्यमार्गावर अब्दुललाट, इचलकरंजी, पाच-मैल आणि कर्नाटक राज्याकडे जाणारी वाहने शेतकरी आंदोलकांनी रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. एस. टी बस रोखून धरल्याने अनेक प्रवाशांना पायी जावे लागले. सपोनि रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा हेरवाड येथे तैनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेत शिवतीर्थ येथे सलगर-सदलगा राज्यमार्ग अडवून शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी बोलताना स्वाभिमानीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराज म्हणाल्या की, माजी खासदार शेट्टी यांनी ७ तारखेच्या ऊस परिषदेनंतर जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर परिषदेच्या ठिकाणीच ठिय्या आंदोलन केले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका झाल्या. कारखानदार मात्र आमच्या मागण्या मान्य करण्यास अद्यापही तयार नाहीत. आज चक्काजाम आंदोलन केले आहे, यापुढेही उग्र आंदोलने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :