कोल्हापूर

कोल्हापूर: बांबवडेत बेशिस्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी खडसावले

अविनाश सुतार

बांबवडे: पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुरू असणारी मनमानी सहन करणार नाही. रुग्णांना योग्य सेवा-सुविधा आणि वेळेत औषधोपचार मिळावेत, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा बांबवडेचे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी दिला.

बांबवडे आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा विस्कळीत झाल्याने सामान्य नागरिकांमधून वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने यांच्या कार्यपद्धतीवरून संतापजनक तक्रारींचा सूर आळवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरपंच चौगुले यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट देत केलेल्या पाहणीत संबंधित वैद्यकीय अधिकारी दालनात अनुपस्थित होते. मात्र, मोठ्या संख्येने रुग्ण ताटकळत उभे असल्याचे पाहून संतापलेल्या सरपंचांनी येथील बेशिस्तीवरून कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

याच अनुषंगाने आरोग्य विभागाची तातडीने बैठक बोलवून सरपंच चौगुले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. बैठकीसाठी मुद्दाम पाचारण करण्यात आलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनाही पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

बांबवडे आरोग्य वर्धिनीकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने हे विहित वेळेत कार्यरत राहत नाहीत. अधीन वैद्यकीय अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देतात. अंतर रुग्णसेवेकडे दुर्लक्ष, रुग्णांना बाहेरून औषध खरेदीची सक्ती, गरोदर महिलांना प्रसुतीसाठी खाजगी दवाखान्यात पाठविणे. ठराविक सोनोग्राफी केंद्राकडे चाचणीचा आग्रह करणे आदी आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या प्रकाराबाबत सरपंच भगतसिंग चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याकडे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या आहेत. बैठकीत याचे पडसाद उमटले.

शिवाय तीन महिने वीजबिल भरणा न केल्याने या केंद्राचा वीजपुरवठा खंडित केल्याची बाब निदर्शनास आणून देत विजय बोरगे यांनी येथील लिपिकाला जबाबदार धरून चांगलेच खडसावले. त्यातही जनरेटरही बंद अवस्थेत आहे. डॉक्टर निवासात वीज नाही. रुग्णांना बैठकीची पुरेशी सोय नाही. औषध आवक जावक हस्तांतर रजिस्टर अपूर्ण, आदी गंभीर बाबींवर नाराजी व्यक्त करून सुधारण्याबाबत पूरक चर्चा करण्यात आली.

यावेळी डॉ. मदने यांना बेजबाबदार कर्तव्यावरून धारेवर धरण्यात आले. सेवा कारभारात सुधारणा करा, अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी मदने यांची खरडपट्टी केली. डॉ. निरंकारी यांनी रुग्ण सेवेबरोबरच यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याचे बैठकीत आश्वासन दिले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT