Six crore plantation scheme
पेठवडगाव : गगनबावडा, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांवर करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी विदेशी झाडांऐवजी देशी प्रजातींना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी निसर्गमित्रांच्या भेटीत दिले. याच पार्श्वभूमीवर निसर्गमित्रांकडून विदेशी झाडांची लागवड थांबवून स्थानिक झाडांना प्राधान्य देण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर वृक्षलागवडीसाठी साधारण सहा कोटींची निविदा काढली आहे. या निविदेत सुमारे ४६ हजार झाडे लावण्याचे नियोजन असून, यामध्ये पुन्हा गुलमोहर, टेब्युबिया, रेनट्री, कोनोकोर्पस, टिकोमा यांसारख्या विदेशी झाडांचा समावेश होण्याची शक्यता होती. निसर्गमित्रांच्या मते विदेशी झाडांच्या वाढत्या लागवडीमुळे स्थानिक जैवविविधता, पर्यावरणीय संतुलन, पक्षी–फुलपाखरांचे नैसर्गिक अधिवास तसेच मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
कोल्हापूर – सांगली मार्गांवरील मागील लागवडींचा अनुभवही याबाबत नकारात्मक ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांच्याशी झालेल्या चर्चेत जांब, कुसुम्ब, कडुलिंब, कदंब यांसारख्या देशी प्रजाती त्या भागाच्या वातावरणाला सर्वाधिक पोषक असल्याचे सांगण्यात आले. या झाडांच्या सुवासिकता, औषधी गुणधर्म, परागीभवनासाठी उपयुक्तता, सावली निर्माण करण्याची क्षमता यामुळे त्यांच्या लागवडीस मोठी उपयुक्तता असल्याचे निसर्गमित्रांनी पटवून दिले.
या चर्चेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील SOP मध्ये आवश्यक बदल करून देशी झाडांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले. स्थानिक प्रजातींची सविस्तर यादीही निसर्गमित्रांकडून विभागाला देण्यात आली आहे. यामुळे पुढील काळात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात रस्त्यांच्या दुतर्फा नैसर्गिकदृष्ट्या योग्य, पर्यावरणपूरक व जैवविविधतेला पूरक अशी देशी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी सुहास वायंगणकर, निर्मला पाटील बेदरे, अभिजीत वाघमोडे, परितोष उरकुडे, दिग्विजय शिर्के, अक्षय खोंद्रे, अवधूत सुतार उपस्थित होते.