नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात मंगळवारी (दि. २६) श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. पहाटे चार वाजता काकड आरती होणार आहे. सकाळी आठ ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक होईल. दुपारी बारा वाजता श्रींच्या मुख्य चरण कमलावर महापूजा होऊन पान पूजा बांधण्यात येईल. दुपारी ब्रह्म वृद्धांकडून पवमान पंचसूक्त पठाण होणार आहे. यावेळी ह. भ. प सरदेसाई यांचे कीर्तन होणार आहे. दत्त मंदिर रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. Shree Dutt Janmotsav
पावणे पाच वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे आगमन श्री जन्म काळासाठी मंदिरात होईल. यानंतर ठीक पाच वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत जन्मकाळ संपन्न होईल. यावेळी उद्धरी गुरुराया या पाळण्याचे पठण तसेच आरती होईल. यानंतर पाळणा दर्शनासाठी वासुदेव उर्फ अजित पुजारी यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. रात्री दहा वाजता धूप दीप नैवेद्य पालखी सोहळा होईल. शेजारती होऊन दिवसभरातील कार्यक्रम समाप्त होतील. Shree Dutt Janmotsav
दत्त जयंतीनिमित्त मंदिरावर मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संस्थानमार्फत भाविकांच्या मदतीतून मंदिरासमोर नव्याने पोर्च उभारण्यात आला आहे. या पोर्चवर उभे राहून भाविकांना जन्मकाळ सोहळा प्रथमच पाहता येणार आहे. दक्षिण उत्तर दर्शन रांग व विश्रांतीसाठी भव्य शामियाने उभारण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
बस स्थानकापासून मंदिरापर्यंत होणारी गर्दी लक्षात घेऊन एकेरी वाहतूक सुरू केली आहे. बाहेरील दुकानदारांसाठी जागेची आखणी करून देण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक गर्दी हाताळण्यासाठी कार्यरत झाले आहेत. दत्त जयंती निमित्त दत्तनगरी दुमदुमली असून जन्मोत्सव सोहळ्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा