कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि लगतच्या कर्नाटकातील गोरगरीब, मध्यमवर्गीय रुग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) ब्लड बँकेत रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. सीपीआरची ब्लड बँक गोठली असून, अवघ्या 11 पिशव्या येथे शिल्लक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकर्ते गुंतले आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिरे झालेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय 2 आणि खासगी 11 अशा एकूण 13 ब्लड बँकांत रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.
सामाजिक संस्था, महाविद्यालये, दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सीपीआरमध्ये दररोज 1,500, तर महिन्याला 35 ते 40 हजार रुग्णांवर उपचार केले जातात. अतिगंभीर रुग्णांना व काही विभागांतील नियमित रुग्णांना रक्तपुरवठा करावा लागतो. हृदय शस्त्रक्रिया, डायलेसिस, थॅलेसेमिया, हिमोफेलिया, जेबीसिंड्रोम, कॅन्सर, प्रसूती विभागातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सातत्याने रक्ताची नियमित गरज भासत असते. दररोज 50 ते 60 रक्ताच्या पिशव्या लागतात. एका रक्ताच्या पिशवीत 350 मिलिलिटर रक्त असते. अशा 1,200 ते 2,000 रक्त पिशव्यांची गरज दर महिन्याला लागते. सीपीआरमधील रुग्णांना सीपीआर ब्लड बँकेतून रक्त पुरवले जाते. खासगी रुग्णालयांत उपचार घेणार्या रुग्णांना रक्ताची गरज भासली, तर येथे मुबलक रक्त पिशव्यांची उपलब्धता असेल तरच उपलब्ध करून दिले जाते.
जिल्ह्यात दररोज समारे 250 ते 300 रक्ताच्या पिशव्या रुग्णांना चढविल्या जातात, असे चित्र आहे. पंधरा दिवसांपासून रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. रक्तपेढ्यांमधून तातडीच्या शस्त्रक्रिया, गंभीर रुग्ण आणि थॅलेसेमिया रुग्णांना रक्त दिले जात आहे; पण त्यांनाही रक्त गटाची मोठी अडचण निर्माण झाल्याने ब्लड बँकांची मागणीच्या प्रमाणात हव्या त्या गटाचे रक्त देताना कसरत होत आहे.
वेगवेगळ्या आजारांमध्ये रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासते. प्रसूतीमध्ये मातेला किंवा नवजात बालकालाही रक्ताची गरज भासते. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी त्याला रक्त चढवावे लागते. अलीकडे डेंग्यूसह अनेक प्रकारच्या व्हायरलचा शिरकाव झाल्याने अनेकांना रक्तातील घटकांची गरज भासत आहे. रक्त संकलन केल्यानंतर 42 दिवसांपर्यंत ते सुरक्षित समजले जाते.