Kolhapur flood
शिवाजी पूल बंद 
कोल्हापूर

कोल्हापूर : शिवाजी पूल बंद; वाहनधारकांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आल्याने पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बुधवारी रात्री बंद केली. अचानक शिवाजी पुलावरील वाहतूक बंद झाल्याने वडणगे, आंबेवाडी, चिखली आदी परिसरासह पुढे जाणार्‍या वाहनधारकांचे अतोनात हाल झाले. पुढे सोडण्यावरून नागरिक आणि पोलिस प्रशासनात वादावादी होत राहिली. मात्र पोलिसांनी वाहने सोडली नाहीत. परिणामी अनेकजण कोल्हापुरातच अडकले तर काहींनी पुणे-बंगळूर महामार्गावरून शिये-निगवे-कुशिरे अशा मार्गाचा अवलंब केला.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते कोतोली फाटा या दरम्यान मंगळवारी कासारी नदीचे पाणी आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून ती केर्ली-जोतिबा-दानेवाडी-वाघबीळ या मार्गे वळण्यात आली. आज या ठिकाणी आलेल्या पाण्याची पातळी आणखी वाढत गेली. दरम्यान आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पंचगंगेच्या पुराचे पाणी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आले. दिवसभर या पाण्यातून वाहतूक सुरू होती. मात्र, सायंकाळनंतर या पाण्याची पातळी वाढत गेली.

आंबेवाडी-चिखली मार्गावरही दोन ठिकाणी सकाळी पाणी आले. सायंकाळी त्याचीही पातळी वाढत गेली. चिखली-वरणगे मार्गावर प्रयाग येथील संगमस्थळावरील पूल आणि रस्ताही पाण्यात गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंदच आहे. वडणगेकडे जाणारा पोवार पाणंद रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे आंबेवाडी फाटा ते वडगणे या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू होती. या मार्गावरही सकाळपासून पाणी आले होते. त्याची पातळीही सायंकाळी वाढली.

या सर्व पार्श्वभूमीवर रात्री पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. त्यात पाण्याचा प्रवाहही जोरदार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक शिवाजी पुलावरच बंद केली. रात्री शिवाजी पुलावर अचानक बॅरिकेडिुंग लावून पोलिसांनी वाहतूक अडवली.

वडणगे, चिखली, आंबेवाडीसह केर्ली, जोतिबामार्गे जाणार्‍या सर्वांना पोलिस माघारी पाठवत होते. पुणे-बंगळूर महामार्गावरून शियेमार्गे जाण्याचा सल्लाही दिला जात होता. यामुळे वादावादी होत होती. नागरिक सोडण्याची विनंती करत होते. मात्र, पोलिस त्याला नकार देत होते. अचानक बॅरिकेडिंग करून रस्ता कसा काय अडवला, याची माहिती काही वेळ अगोदर द्यायला हवी होती, आम्ही लवकर बाहेर पडलो असतो. घरी अनेक अडचणी आहेत, त्याचे काय करायचे, असे सवालही अनेकजण करत होते.

पर्यायी मार्गाचा अवलंब करून शिये-जोतिबा-केर्लीमार्गे आलो तरी रजपूतवाडीजवळ रस्ता बंदच केला आहे. मग गावात जायचे कसे? आंबेवाडी फाटा ते वडणगे रस्त्यावर पाणी आलेल्या ठिकाणी गावातील तरुण, नागरिक थांबून आहेत. ते गावात येणार्‍या वाहनधारकांना पाण्यातून पुढे जाण्यासाठी मदत करत आहे, यामुळे आम्हाला जाऊद्या, अशी विनंती करण्याबरोबरच नागरिक संतप्त होऊन वादही घालत होते.

कसबा बावडा-शिये हा मार्गही बंद आहे. यामुळे कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेलमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावरून शियेमार्गे काहींनी घर गाठले. काहींनी कोल्हापूरसह परिसरात नातेवाईक, मित्रांकडे राहण्याचा निर्णय घेतला.

SCROLL FOR NEXT