शिरढोण येथे विहिरीलगत बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयावरून ठेकेदार, ग्रामसेवक, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | शिरढोण येथे विहिरीलगतच्या तलाठी कार्यालयावरून ग्रामपंचायत, ठेकेदार व अधिकारी धारेवर

त्रुटीपूर्ण नियोजनाचा आरोप; चुकीचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Shirol Taluka Shirdhon Gram Panchaya

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील जुन्या गावविहिरीच्या काठावर उभारण्यात येत असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामावरून ग्रामपंचायत प्रशासन, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांचा भडिमार केला.

महसूल विभागासाठी सुमारे १० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार थेट जुन्या विहिरीच्या दिशेने ठेवण्यात आल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालय परिसरात संरक्षण कठडे, सुरक्षित प्रवेशमार्ग किंवा इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचे पाहणीत निदर्शनास आले.

यावेळी नागरिकांनी, “गावात इतर पर्यायी जागा उपलब्ध असताना विहिरीलगतच कार्यालय उभारण्याचा निर्णय का घेण्यात आला?”, “अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार का करण्यात आला नाही?” असे सवाल उपस्थित केले. चुकीची जागा निवडणे आणि अपुरे नियोजन यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

दरम्यान, या कामाला वर्षभराहून अधिक कालावधी उलटूनही बांधकाम पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बदल करूनच काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"बांधकामाला सोन्या-चांदीच्या विटा लावल्या आहेत काय?"

संतप्त नागरिकांनी ठेकेदार, ग्रामसेवक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुमारे १० लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याचे प्रत्यक्ष कामावरून जाणवत नसल्याने, “इतका निधी खर्च होऊनही कामाची गुणवत्ता आणि प्रगती दिसत नाही. काय या बांधकामाला सोन्या-चांदीच्या विटा लावल्या आहेत?” असा उपरोधिक सवाल नागरिकांनी उपस्थित केला. निधीचा वापर, कामाची गुणवत्ता आणि विलंब यांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT