Shirol Shirdhon Excise Raid Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Excise Raid | सहा गाड्या, १३ अधिकाऱ्यांची धाड... पण हाती लागले शून्य! शिरढोणमधील राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई निष्फळ

चार ठिकाणी अवैध दारूसाठा किंवा अन्य कोणताही बेकायदेशीर मुद्देमाल आढळून आला नाही

पुढारी वृत्तसेवा

Shirol Shirdhon Excise Raid

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथे विशेष ग्रामसभेत अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर झालेल्या तीव्र चर्चेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कुरुंदवाड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी संयुक्त धाडसत्र राबविले. दुय्यम निरीक्षक एम. पी. खेत्री यांच्या नेतृत्वाखाली १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक सहा चारचाकी वाहनांसह गावात दाखल झाले. संशयित चार ठिकाणी कसून झडती घेण्यात आली.

मात्र, या संपूर्ण कारवाईत कोणत्याही ठिकाणी अवैध दारूसाठा किंवा अन्य कोणताही बेकायदेशीर मुद्देमाल आढळून आला नाही. परिणामी संयुक्त पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

ग्रामसभेत झालेल्या आरोपांनंतर मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष कारवाईत काहीही निष्पन्न न झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून गावात विविध चर्चांना उधाण आले आहे.

ग्रामसभेत महिला आणि ग्रामस्थांनी गावातील अवैध दारूविक्रीवर सातत्याने व प्रभावी कारवाई करण्याची जोरदार मागणी केली होती. धाडीनंतरही कोणताही मुद्देमाल न सापडल्याने संबंधित यंत्रणांनी अधिक सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या बेकायदेशीर दारूविक्रीच्या तक्रारीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कुरुंदवाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने शिरढोण येथे संशयित चार ठिकाणी धाडी टाकल्या. मात्र तपासणीदरम्यान कोणताही मुद्देमाल अथवा संबंधित साहित्य आढळून आले नाही.
— एम. पी. खेत्री, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, इचलकरंजी विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT