Shirdhon Gram Panchayat  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | शिरढोण ग्रा. पं. तीच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीत अनियमितता: सरपंच, सदस्यांना खुलासा देण्याचे आदेश

तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा; खुलासा घेऊन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Shirdhon Gram Panchayat 15th Finance Commission

बिरू व्हसपटे

शिरढोण : शिरढोण ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापरातील कथित अनियमितता, अपूर्ण दप्तर तसेच कर वसुलीच्या रकमेतून रोखीने करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जयवंत द. उगले यांनी संबंधित कालावधीतील तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिरढोण ग्रामपंचायतीच्या कारभाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणात तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी विनायक आनंदा शेवरे आणि दयानंद राऊ कांबळे यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. मात्र, १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे करणे, साहित्य खरेदी, ग्रामपंचायत सभेची मंजुरी, आर्थिक व्यवहार, कामांच्या नोंदी तसेच साठा व डेडस्टॉक रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे या प्रक्रियेत पदाधिकारी आणि सदस्यांचीही भूमिका असल्याने त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारदार अविनाश रामगोंडा पाटील व इतरांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या तक्रारीतील आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्यांचीही चौकशीदरम्यान दखल घेण्यात येणार आहे. संबंधित तत्कालीन सरपंच व सदस्यांकडून खुलासा घेऊन त्यांची भूमिका तपासावी, जबाबदारी निश्चित करावी आणि त्याबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सध्या शिरढोण ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत आहे. मात्र, मागील कालावधीतील कारभाराची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये या चौकशीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चौकशीत कोणते निष्कर्ष समोर येतात, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सरपंच, अधिकाऱ्यांनंतर आता सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात!

१५व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित अनियमिततेप्रकरणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनंतर आता संबंधित तत्कालीन सरपंच आणि सदस्यांचीही भूमिका तपासली जाणार आहे. कारणे दाखवा नोटिसांद्वारे त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार असून, निधीचा वापर, विकासकामे, साहित्य खरेदी, सभेची मंजुरी आणि आर्थिक व्यवहार यामधील त्यांच्या भूमिकेच्या आधारे जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT