

जयसिंगपूर : जैनापूर (ता. शिरोळ) येथील चांदोली वसाहत येथे झालेल्या तीन लाख ९५ हजार रुपयांच्या घरफोडीचा गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौशल्याने अवघ्या १० तासांत छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादीच्या बहिणीच्या मैत्रिणीनेच आपल्या चैनीच्या गरजा भागवण्यासाठी हा डल्ला मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तरुणीला ताब्यात घेतले असून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी तन्वी सुहास लेले (२३, रा. दिशा चैत्रबन अपार्टमेंट, नक्षत्रवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) असे संशयित आरोपी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष रामचंद्र पवार (रा. चांदोली वसाहत, जैनापूर) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. राहत्या घरात ऑगस्ट २०२५ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. सोमवारी (२१ सप्टेंबर) या घरफोडीची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली होती. तपासात स्वतःच्या चैनीच्या गरजा भागवण्यासाठी मैत्रिणीने वेळोवेळी घरातून सोने व रोकड लांबवली होती.