Shirol Animal Theft Gang Active AI
कोल्हापूर

Buffalo Stolen Kolhapur | शिरढोणात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय; गोठ्यात दावे कापून दीड लाखांची म्हैस चोरीला

सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Shirol Animal Theft Gang Active

शिरढोण : शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हरगुल रस्त्यावरील शेतकरी महेश बेबडे यांच्या गोठ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची म्हैस अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी गोठ्यात बांधलेली म्हैस दावे कापून लंपास केली. शनिवारी सकाळी गोठ्यातील म्हैस गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दरम्यान, त्याच रात्री कुरुंदवाड रस्त्यालगतच्या एका ठिकाणीही जनावरे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती मिळाली आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी चार दिवसांपूर्वी सुवर्णा कोरे यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम व सोन्याची चेन चोरीला गेली होती. त्यानंतर आता जनावरे चोरीची घटना घडल्याने गावात चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही दिवसांत जबरी चोरी, घरफोडी तसेच भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची गती वाढवून चोरट्यांचा शोध घ्यावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांचे फावले

शिरढोण ग्रामपंचायतीने गावात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांमधील संशयितांचा माग काढणे कठीण बनले असून गावाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करून देखरेख व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT