Pathology Labs Network AI Photo
कोल्हापूर

Illegal Blood Testing Centers | रक्त तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट?; मनमानी दरांची आकारणी

शिरोळ तालुक्यासह परिसरात खासगी पॅथॉलॉजी लॅब आणि रक्त संकलन करणाऱ्या एजंटांचे जाळे वाढले

पुढारी वृत्तसेवा

Shirol Private Pathology Labs Network

शिरढोण : शिरोळ तालुक्यासह परिसरात खासगी पॅथॉलॉजी लॅब आणि रक्त संकलन करणाऱ्या एजंटांचे जाळे वाढत असताना, रक्त तपासणीसाठी मनमानी दर आकारून सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. एकाच प्रकारच्या रक्त तपासणीसाठी विविध लॅबमध्ये वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची जिल्हा आरोग्य विभागाने चौकशी करून दरनियमनाची स्पष्ट नियमावली लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक एजंट गावोगावी फिरून रक्ताचे नमुने संकलित करून ते खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवत आहेत. मात्र, या सेवेसाठी कोणतेही एकसमान किंवा अधिकृत दर निश्चित नसल्याने रुग्णांकडून मनमानी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी तपासणीच्या प्रत्यक्ष खर्चापेक्षा अधिक रक्कम वसूल करून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचेही सांगितले जात आहे.

आरोग्य सेवा ही नफेखोरीचे साधन नसून सार्वजनिक हिताची बाब आहे. मात्र, रक्त तपासणीच्या शुल्कात असलेली तफावत पाहता या क्षेत्राचे व्यापारीकरण वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः गरीब, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर या अतिरिक्त खर्चाचा मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे दिसून येत आहे. एकाच तपासणीसाठी वेगवेगळे दर आकारण्यामागील निकष काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

यापार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने सर्व खासगी पॅथॉलॉजी लॅब, रक्त संकलन केंद्रे आणि एजंटांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांसाठी पारदर्शक, अधिकृत आणि एकसमान दर निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

'दरनियमन करा; अन्यथा उग्र आंदोलन' "रक्त तपासणी ही प्रत्येक रुग्णासाठी अत्यावश्यक आरोग्य सेवा आहे. मात्र, निश्चित दर नसल्याने अनेक ठिकाणी मनमानी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने सर्व पॅथॉलॉजी लॅबचे अधिकृत दरपत्रक जाहीर करून ते दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लॅब आणि एजंटांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल.
- विश्वास बालिघाटे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT