Kolhapur ZP School Sanitation
बिरू व्हसपटे
शिरढोण : जिल्हा परिषद शाळांच्या इमारती, परिसर तसेच स्वच्छतागृह स्वच्छ व सुस्थितीत राहावीत आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी आठवड्यातून किमान दोन वेळा शाळा स्वच्छता मोहीम राबवावी, असे सक्तीचे आदेश पंचायत समिती शिरोळ यांनी दिले आहेत. यासंदर्भातील पत्र सर्व ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १९५६ जिल्हा परिषद शाळा कार्यरत असून, या शाळांमध्ये शासनाच्या विविध योजनांद्वारे भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हेतू असला तरी, त्या सुविधांचा प्रभावी वापर होण्यासाठी शाळेचा परिसर व स्वच्छतागृहे नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील शाळांची स्वच्छता दर सोमवारी व गुरुवारी सकाळी ९ ते १० या वेळेत करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. ही स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार असून, त्यासाठीचा खर्च महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील तरतुदीनुसार मंजूर करण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
तसेच, शाळा स्वच्छतेचा सविस्तर अहवाल प्रत्येक महिन्याच्या २ तारखेपर्यंत पंचायत समितीकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
आठवड्यातून दोनदा शाळा स्वच्छता मोहीम
सोमवार व गुरुवार सकाळी ९ ते १० वेळ निश्चित
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता
शाळा इमारत, परिसर व स्वच्छतागृहांवर विशेष भर
मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य