Haroli Gram Panchayat Tax Collection Notice
बिरू व्हसपटे
शिरढोण : हरोली (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीने “घरपट्टी व पाणीपट्टी भरा, मगच बोला” असा अजब व लोकशाहीविरोधी आदेश काढून तो थेट ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावल्याने गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आल्याने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या निर्णयातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोणतीही चर्चा न करता हा आदेश काढण्यात आला. त्यामुळे संबंधित नोटीशीला ग्रामपंचायत सदस्य महावीर चौगुले, तुषार गुजरे, अनिता पाटील, स्नेहल रोहित कांबळे यांच्यासह अजित पाटील, रामदास सुतार, फिरोज मुजावर, अरुण कांबळे, शामराव कदम आदींनी उघड विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, सरपंच तानाजी माने यांनी ही बाब प्रशासनाकडून अनवधानाने घडल्याचे सांगत सदरची नोटीस मागे घेण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. कर भरणे हे नागरिकांचे कर्तव्य असले तरी बोलण्याचा अधिकार अटींवर देणे ही लोकशाहीची थट्टा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
या आदेशामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही मूल्यांचा व मूलभूत हक्कांचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने आधी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा कराव्यात, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय नियमित सुरू नसणे, ग्रामसेवकांची अनुपस्थिती, पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आणि कर वसुलीतील अपारदर्शकता यामुळे आधीच नाराजी असताना, या आदेशामुळे ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढला आहे. भविष्यात अशा प्रकारचे आदेश न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
कर वसुलीची रजिस्टर व दप्तर अद्ययावत आहेत काय, कार्यालय नियमित सुरू असते काय, ग्रामसेवक उपस्थित राहतात काय आणि पाणीपुरवठा नियमांनुसार होतो काय, याची उत्तरे द्यावीत; अन्यथा लोकशाहीचा अपमान थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.