शिरढोणमध्ये शेतकऱ्यावर उभे पीक नांगरून जमीनदोस्त करण्याची वेळ आली  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | शिरढोणमध्ये सव्वा एकरातील मका पीक जमीनदोस्त; नैराश्यातून शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला टॅक्टर

करप्या रोग व तीव्र उष्णतेचा फटका; ८० हजारांची गुंतवणूक वाया

पुढारी वृत्तसेवा

Shirdhon Farmer Distress

शिरढोण :शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे तीव्र उष्णता आणि करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्वीट कॉर्न मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून, उत्पादनाची सर्व आशा संपुष्टात आल्याने एका शेतकऱ्यावर उभे पीक नांगरून जमीनदोस्त करण्याची वेळ आली आहे.

येथील शेतकरी आण्णाप्पा आदाप्पा आडगाणे यांनी सव्वा एकर क्षेत्रात स्वीट कॉर्नची लागवड केली होती. पिकासाठी महागडे बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीवर ८० हजार रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता. मात्र, यंदाच्या वाढत्या तापमानामुळे आणि करप्या रोगाच्या तीव्र प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटली. परिणामी अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली.

मोठी आर्थिक गुंतवणूक करूनही हातात काहीच येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आडगाणे यांनी नैराश्यातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभ्या पिकावर नांगर फिरवत संपूर्ण पीक जमीनदोस्त केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, शेतीतील वाढता खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी किती अडचणीत सापडत आहेत, याचे हे विदारक उदाहरण ठरत आहे.

यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये वाढलेल्या तापमानाचा विपरीत परिणाम मका पिकावर झाला आहे. त्यातच करप्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करत आहेत.

दरम्यान, संबंधित पिकाचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आण्णाप्पा आडगाणे यांनी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची घोषणा करण्याची मागणीही जोर धरत आहे.

८० हजारांची गुंतवणूक पाण्यात

शिरढोण येथील शेतकरी आण्णाप्पा आडगाणे यांनी सव्वा एकर क्षेत्रात स्वीट कॉर्नची लागवड करून ८० हजार रुपयांहून अधिक खर्च केला होता. मात्र तीव्र उष्णता आणि करप्या रोगामुळे पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादनाची आशा संपुष्टात आली. अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभे पीक नांगरून जमीनदोस्त केले असून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT