Kolhapur News | विशाळगडावर दारू पिऊन धिंगाणा : कर्नाटकातील पाच पर्यटकांवर शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

विशाळगडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मुधोळच्या ५ पर्यटकांना बेड्या; गडकिल्ल्यांवर हुल्लडबाजी केल्यास पोलिसांचा कारवाईचा इशारा!
विशाळगड येथे मद्यधुंद अवस्थेत  हुल्लडबाज करणारे पर्यटक.
विशाळगड येथे मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाज करणारे पर्यटक.
Published on
Updated on

विशाळगड : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकांना शाहूवाडी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. विशाळगडावर उघड्यावर दारू पिऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्नाटकच्या पाच पर्यटकांना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

गंगाधर मारुती दोडमणी (वय ३३ वर्ष), मुथु सैदु बैलंगली (वय ३३ वर्ष), ​मल्लाप्पा सदाशिव शिंदे (वय ६० वर्ष), ​चाणकेश्वर लिंगाप्पा बागी (वय ३४ वर्ष), आनंद लक्ष्मण बागी (वय ३८, सर्व राहणार सैदापूर गल्ली, वार्ड नंबर ३, मुधोळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

​रविवार, १४ जून २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विशाळगड येथील ऐतिहासिक ‘मुंढा दरवाजा' परिसरात या पर्यटकांनी मद्यप्राशन करून जोरदार हुल्लडबाजी सुरू केली होती. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी अशा कृत्यांना बंदी घातलेली असतानाही, या पर्यटकांनी कायद्याचे आणि गडकिल्ल्यांच्या संस्कृतीचे सर्रास उल्लंघन केले. या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा असा अवमान पाहून शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली होती.

पोलिसांची धडक कारवाई

​सोशल मीडियावरील व्हिडिओची गंभीर दखल घेत शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. विशाळगडावरूनच या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनुने करत आहेत.

​पोलिसांचा कडक इशारा

हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढेही ऐतिहासिक किल्ल्यांवर गैरवर्तन किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news