Dattwad Dudhganga River Crocodile
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीपात्रात एकाच वेळी दोन मगरींचे दर्शन झाल्याने नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मगरींचे बंदोबस्त करण्याबाबत वारंवार मागणी करून देखील वन विभाग व प्रशासनाकडून दुर्लक्ष होतं आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दत्तवाड येथील कोटलिंग भागात एका शेतकऱ्याची मोटर रिपेरी करण्यासाठी गेलेल्या मिस्त्री व संबंधित शेतकऱ्याला नदीच्या काठावर दोन मगरी ऊन खात असताना निर्दशनास आल्या असता त्यांनी या मगरीचा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावात ठीक ठिकाणी मगरींच्या बंदोबस्त्याची चर्चा रंगू लागली.
मागील महिन्यातच एका पूर्ण वाढ झालेल्या मगरीच्या हल्ल्यात सकाळी पोहायला नदीपात्रात उतरलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला होता. असेच हल्ले जनावरावर वारंवार गेल्या दोन वर्षात झाले आहेत. त्यामुळे दूधगंगा नदी पात्रातील मगरींचा बंदोबस्त करण्यात यावा याबाबत मागणी करूनही वन विभाग व प्रशासनाकडून त्याची फारशी दखल घेण्यात आली नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून केवळ नदीपात्राजवळ एक डिजिटल बॅनर लावण्यात आले आहे." नदीपात्रात मगरीचा वावर असल्याने शेतकरी व नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये या आशयाचा."
दत्तवाड येथील दूधगंगा नदी पात्रात पूर्ण वाढ झालेल्या अनेक मगरींचे वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी किती मनुष्याचे व जनावरांचे बळी द्यावे लागणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.