शिरढोण : शिरढोण(ता.शिरोळ)ग्रामपंचायतीने विकास आराखड्यासंदर्भात बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत दारूबंदी आणि गावातील अवैध धंद्यांच्या मुद्द्यावरून सोमवारी मोठा गदारोळ उडाला. दारूबंदीचा ठराव अस्तित्वात असतानाही गावात राजरोसपणे बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी महिला व ग्रामस्थांनी प्रशासक तथा सरपंच सागर भंडारे आणि ग्रामसेवक विराज जत्थे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे काही काळ ग्रामसभेतील वातावरण तणावपूर्ण बनले.
ग्रामसेवक विराज जत्थे यांनी विकास आराखड्यावरील विषयांचे वाचन सुरू करताच नागरिकांनी अपुऱ्या नागरी सुविधा, विविध विकासकामांवरील खर्च तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेत, "दारूबंदीचा ठराव केवळ कागदोपत्री आहे का? गावात खुलेआम दारू विक्री कशी सुरू आहे?" असा जाब विचारला. तसेच गावात मटका व जुगार क्लबचे जाळे वाढत असून ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आला.
यावर प्रशासक तथा सरपंच सागर भंडारे यांनी संबंधित बाबींविषयी लेखी तक्रार द्या, त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी पुढील पावले उचलू, असे स्पष्ट केले. दरम्यान, शक्तीकुमार कांबळे यांनी ग्रामपंचायतीकडे बेकायदेशीर दारू विक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची लेखी मागणी सादर केली. त्यामुळे शिरढोणमध्ये बेकायदेशीर दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.यावेळी शाहीर बाणदार, अजिंक्य चौगुले, शक्ती पाटील, जब्बार नालबंद, भास्कर कुंभार,रवी कांबळे, पोलिस पाटील अनुराधा जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
"बेकायदेशीर दारूविक्री तसेच इतर अवैध व्यवसायांबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दारूबंदीसाठी महिला व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील."सागर भंडारे, प्रशासक तथा सरपंच, शिरढोण ग्रामपंचायत