Shinpe Villagers oppose Solar Plant
बांबवडे: शिंपे (ता. शाहूवाडी ) येथील गायरान गट क्रमांक ७९४ / अ या क्षेत्रामधील १२ हेक्टर जागेत उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सोलर कृषि प्रकल्पास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. गायरानातील ही जागा या योजनेसाठी दिली असल्याचे सांगत या जागेमध्ये असणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरु आहे. ती त्वरीत थांबवावी व या वृक्षतोडीची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिंपे ग्रामस्थांनी महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
शिंपे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, शाहूवाडीचे तहसिलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गायरान गट क्र . ७९४ / अ मधील १२ हेक्टर क्षेत्रातील जागा ही कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशान्वये मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेस देण्यात आली आहे. या योजनेसाठी या जागेतील वृक्षांची तोड सुरु करण्यात आली आहे.
या जागेत विविध जातीची सुमारे ७५० झाडे आहेत. या योजनेसंदर्भात शासनाने स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व विश्वासात न घेता या जागेतील झाडे तोडण्यास सुरूवात केली आहे. गावातील ९० टक्के कुटुबियांचा उदरनिर्वाह हा दुग्ध व्यवसायावर चालतो. या सर्व कुटुबियांची जनावरे या गायरानामध्ये चरण्यासाठी सोडली जातात, अशा परिस्थितीमध्ये सोलर कृषि वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना भविष्यात आपल्या जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येऊ शकतो.