

कोल्हापूर : वळवाच्या पावसाने मंगळवारी शहरात थैमान घातले. तासाभराच्या कोसळधारांमुळे शहर अक्षरशः तुंबलेे. चौकाचौकांत इतके पाणी साचले होते की, दुचाकींची चाके बुडाली होती. पावसासह वादळी वार्यामुळे शहरात ठिकठिकाणी 50 हून जास्त झाडे कोसळली. यातील काही झाडे दुचाकींवर तर काही झाडे घरांवर कोसळल्याने नुकसान झाले. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूरला शुक्रवारपर्यंत (दि. 23) पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या अनेक भागालाही झोडपले असून चंदगड, शाहूवाडी भागात ढगफुटीसद़ृश पाऊस झाला.
सकाळपासूनच पावसाची हलकी रिपरिप सुरू होती. सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला आणि शहरात सर्वदूर धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. पादचार्यांसह दुचाकीस्वारांना आसरा शोधावा लागला. बघता बघता शहराच्या सखल भागांतील रस्त्यांना आणि चौकांना तळ्याचे स्वरूप आले. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, मंडलिक वसाहत ते हॉकी स्टेडियम, कावळा नाका ते अक्षता मंगल कार्यालय, आयोध्या पार्क, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी पहिली गल्ली, टेंबलाई नाका चौक परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. तासाभरानंतर जोर ओसरला; मात्र पावसाची रिपरिप सुरू होती.
शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. अनेक कुटुंबीयांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे विद्युत वाहिनीवर कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. बाबुभाई परिख पुलाखाली गुडघाभर पाणी साचले होते. यातून दुचाकी जाणे अवघड झाले होते. फोर्ड कॉर्नर परिसरात रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दुचाकी अर्ध्या पाण्यात बुडाल्या. रामानंदनगर, सानेगुरुजी वसाहत, मंगळवार पेठ बेलबाग, प्रतिभानगर, रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत, वाय. पी. पोवारनगर आदींसह शहरात 50 झाडे कोसळली. महापालिकेच्या सहा फायर स्टेशनमधील 25 अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम करत होते. वाय. पी. पोवारनगर येथे रिक्षावर झाड कोसळले, तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत झाडे हटिवण्याचे काम सुरू होते.
भाजी मंडई, फेरीवाले यांची एकच धावपळ उडाली. साहित्याचे संरक्षण करताना फेरीवाल्यांची दैणा उडाली होती. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट, पाडळकर मार्केट, महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी आदी ठिकाणी हे चित्र पाहायला मिळाले. रंकाळा परिसरातील पद्माराजे उद्यानातील आठ ते दहा झाडे कोसळली. गांधीनगर येथील स्वस्तिक मार्केटमध्ये पाणी शिरले. दुकानगाळ्यात पाणी गेल्याने मालाचेही नुकसान झाले.
चंदगड : चंदगड तालुक्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ढगफुटीसद़ृश झालेल्या पावसाने शेती शिवारात पाणीच पाणी झाले. वादळी वार्याने केळीच्या बागांचे नुकसान झाले. आंबे गळून पडले. झालेला पाऊस ऊस पिकांना पोषक ठरला.
बांबवडे : शाहूवाडी तालुक्याच्या बांबवडे, सरूड, वारणा कापशी, मलकापूर, आंबा, शाहूवाडी, करंजफेण तसेच तालुक्याच्या उत्तर भागातील कानसा वारणा खोर्यात दोन ते अडीच तास झालेल्या ढगफुटी सद़ृश पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बाचणी : येथे वादळी वार्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यावेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. भरणी, मका, शाळू, भुईमूग काढणीची कामे खोळंबली आहेत.
कौलव : परिसरात सर्वत्र रस्त्यावरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी शेतातील मक्याचे पीक भुईसपाट झाले असून खरीप हंगामाची पूर्व मशागत ठप्प झाली आहे. राशिवडेसह येळवडे, कोदवडे, भोगावती, मसूर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. कोदवडे, भोगावती, मसूर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. सखल भागामधील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असणार्या शारंग चषक फुटबॉल स्पर्धेअंतर्गत मंगळवारी दुपारच्या सत्रातील सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम यांच्यात झाला. 18 मिनिटांचा सामना झाल्यानंतर प्रचंड वार्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. मैदानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याने अखेर पंचांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला. जोरदार वार्यामुळे मैदानावर ठिकठिकाणचेे बॅनर उडाले, फाटले. खेळाडू स्वागत कमानही पडली. मंडपावरील अनेक पत्रे उडाले. उद्घाटनासाठी आलेल्या महिलांसह फुटबॉलप्रेमींची धावपळ उडाली.