Shahuwadi Talwade school Holi
विशाळगड : होळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती लाकडे, गोवऱ्या आणि पर्यावरणाची हानी. मात्र, शाहुवाडी तालुक्यातील तळवडे येथील जिल्हा परिषद शाळेने या परंपरेला एक नवा आणि विधायक आयाम दिला आहे. शाळेच्या परिसरातील आणि समोरील रस्त्यावरील सर्व केरकचरा एकत्र करून, त्याची होळी पेटवून विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वच्छतेचा संदेश देत हा सण साजरा केला.
आज सकाळी शाळेच्या परिपाठानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी हातात झाडू घेऊन शाळा परिसर आणि मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक, पालापाचोळा व अनावश्यक कचरा गोळा केला. केवळ सण साजरा करायचा म्हणून नव्हे, तर 'आपला गाव, आपली शाळा' स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. जमा झालेला हा सर्व कचरा एका सुरक्षित ठिकाणी एकत्र करून त्याची विधीवत होळी करण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छतेचा जागर असा दुहेरी उद्देश यामागे होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी 'कचरा मुक्त गाव', 'पर्यावरण वाचवा' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, सामाजिक भान जपण्याचे संस्कार या निमित्ताने विद्यार्थ्यांवर झाले. या उपक्रमाचे शाहुवाडी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून, इतर शाळांसाठीही हा एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे. यासाठी मुख्याध्यापिका भारती पाटील, वैष्णवी रेडिज आदींसह विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
सण हे केवळ आनंदासाठी नसून ते समाजाला दिशा देण्यासाठी असतात. वृक्षतोड करून लाकडे जाळण्यापेक्षा, आपल्या परिसरातील अस्वच्छता आणि मनातील वाईट विचार यांची 'होळी' करणे ही काळाची गरज आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तोच खऱ्या अर्थाने आजच्या सणाचा विजय आहे.- भारती पाटील (मुख्याध्यापिका, तळवडे शाळा)