Stray Buffaloes Rescue Shahuwadi
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील कोतोली येथील धनगर वाड्यातील सहा म्हशी चुकून तब्बल २० किलोमीटर अंतर पार करत सावर्डे खुर्द गावात पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या अनपेक्षित प्रसंगी सावर्डे खुर्दमधील तरुणांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे धनगर बांधवांनी म्हशींना चरण्यासाठी मोकळे सोडले होते. दिवसभर चरून रात्री घरी परत येणे ही त्यांची नेहमीची सवय आहे. मात्र त्या दिवशी उशिरापर्यंत म्हशी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. परिसरात जंगल असल्यामुळे जंगली प्राण्यांचा धोका लक्षात घेता रात्री शोध मोहीम राबवणे धोकादायक ठरू शकत होते, त्यामुळे शोध तात्पुरता थांबवण्यात आला.
दरम्यान, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास या सहा म्हशी सावर्डे खुर्द येथे आढळून आल्या. गावातील सतर्क तरुणांनी तात्काळ पुढाकार घेत म्हशींना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवले आणि संपूर्ण रात्र त्यांची काळजी घेतली.
मंगळवारी सकाळी ही माहिती समाजमाध्यमांवरून वेगाने पसरली. बातमी धनगर वाड्यापर्यंत पोहोचताच महिलांनी तत्काळ सावर्डे खुर्द गाठून आपल्या म्हशी ताब्यात घेतल्या. सर्व म्हशी दुभत्या असल्याने त्यांचे सुरक्षित परत मिळणे कुटुंबीयांसाठी दिलासादायक ठरले.
या घटनेतून सावर्डे खुर्द गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी आणि सहकार्याची भावना विशेष उल्लेखनीय आहे. अनोळखी जनावरांचीही जपणूक करत त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श उभा केला आहे.