

बिरू व्हसपटे
शिरढोण : हरोली ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वित्त आयोग निधीतून सुमारे १० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. यातून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि पाणीपुरवठा विभागावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेत हरोली ग्रामपंचायतीने आत्मनिर्भरतेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
या प्रकल्पामुळे गावातील शासकीय सेवा सौर ऊर्जेवर चालणार असून विजेवरील अवलंबित्व कमी होणार आहे.४ लाख रुपयांच्या वीजबिलाची बचत होणार आहे. सरपंच तानाजी माने उपसरपंच जयप्रकाश माने, ग्रामसेवक रावसाहेब कोळी व सर्व सदस्यांच्या संकल्पनेला ग्रामस्थांमधून चांगलीच दाद मिळत आहे.
सौर ऊर्जेमुळे भारनियमन, व्होल्टेज चढ-उतार आणि वाढत्या वीज बिलांच्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेशी जोडल्याने गावाला नियमित व कमी खर्चात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेलाही अखंडित वीजपुरवठा मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने कर वसुलीत वाढ करण्यासाठी अभिनव योजना राबवली आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना मोफत धान्य दळप करून देण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना दररोज २० लिटर शुद्ध आर.ओ. पाणी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांमुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. सौर ऊर्जा व लोकसहभागाच्या बळावर हरोली ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण करत असून इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.