Shahuwadi Shirgaon Ashwini Gurav Mumbai Police Selection
सुभाष पाटील
विशाळगड : "इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि जिद्द असेल तर आभाळही ठेंगणं होतं," याचाच प्रत्यय शाहूवाडी तालुक्यातील शिरगांव येथील एका कन्येने आणून दिला आहे. येथील वीटभट्टी चालक आबाजी गुरव यांची कन्या अश्विनी हिची नुकतीच मुंबई पोलीस पदी निवड झाली आहे. अत्यंत हलाखीच्या आणि कष्टाच्या परिस्थितीतून मार्ग काढत अश्विनीने मिळवलेले हे यश संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
अश्विनीचे वडील आबाजी गुरव हे वीटभट्टी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तिला पाच बहिणी व लहान भाऊ आहे. अश्विनीने केवळ पुस्तकी अभ्यास केला नाही, तर आई-वडिलांना वीटभट्टीच्या कामात नेहमीच मदत केली. एका बाजूला विटांचा चिखल तुडवायचा, उन्हातान्हात कष्ट करायचे आणि दुसऱ्या बाजूला वेळ मिळेल तसा पोलीस भरतीचा अभ्यास व मैदानी सराव करायचा, असा तिचा खडतर दिनक्रम होता. परिस्थितीशी दोन हात करत तिने आपले खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.
अश्विनीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबाचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले असून, शिरगांव आणि शाहूवाडी परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी अश्विनीचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरेल.
"परिस्थिती कितीही खडतर असली, तरी प्रामाणिक कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे अश्विनीने दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातील आणि विशेषतः गरिबीशी झुंजणाऱ्या हजारो तरुण-तरुणींसाठी अश्विनी गुरव हिचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही!"