Kasari Dam water level Pudhari
कोल्हापूर

Kasari Dam | कासारी मध्यम प्रकल्प: उन्हाच्या तडाख्याने पाणीसाठ्यात घट

जलाशयात ४४.५४ टक्के साठा शिल्लक

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur dam storage 2026

सुभाष पाटील

विशाळगड : शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील ६१ गावांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या कासारी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे झपाट्याने खालावू लागला आहे. गेल्या वर्षी दमदार पाऊस होऊनही, यंदा कडाक्याच्या उन्हामुळे बाष्पीभवन आणि वाढत्या मागणीचा दुहेरी फटका धरणाला बसला आहे. सध्या धरणात केवळ ४४.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिस्थिती चिंताजनक वळणावर पोहोचली आहे.

​२.७७ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या १.२३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ०.१७ टीएमसीने कमी आहे. बुधवारी (दि. १५) घेतलेल्या नोंदीनुसार, धरणाची पाणीपातळी ६१३ मीटरवर स्थिरावली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ही पातळी ६१४.४० मीटर इतकी होती. अवघ्या वर्षभरात झालेली ही घट भविष्यातील भीषण टंचाईचे संकेत देत आहे.

मार्च महिन्यात जेमतेम निम्म्यावर असलेला हा साठा आता निम्म्यापेक्षाही खाली आला आहे. पारा वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला पाणीपुरवठा करताना पाण्याचा उपसा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे मानवी वस्त्यांमध्ये पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे.

प्रशासनाचे आवाहन

​पाटबंधारे विभागाने पाणी नियोजनाचा आराखडा तयार केला असला, तरी नागरिकांनी जबाबदारीने वागणे काळाची गरज आहे. "थेंब थेंब वाचवा" या उक्तीप्रमाणे पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. जर पावसाचे आगमन लांबले, तर परिस्थिती अधिक कठीण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाणीसाठा कमी होत असला तरी, जूनअखेरपर्यंत शेती आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे.
— आय. जी. नाकाडे (कालवा निरीक्षक, पाटबंधारे विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT