Heavy Rainfall Impact on Farming in Shahuwadi
विशाळगड :
''राजा कोपला, पाऊस झोडपे,
दाद कुणाकडे मागावी आता?
रोहिणी नक्षत्राचे दिवस सरले,
अवकाळीने घातली चिंता''
शाहूवाडी तालुक्यात दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्रावर भाताची धूळवाफ पेरणी केली जाते. मात्र, यंदा मे महिन्यातच पावसाने ऐनवेळी अवकाळी आगमन करून सर्वच शेती कामांची घडी विस्कटून टाकली आहे. मागील आठवड्याभरात या भागात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पेरणीपूर्वी शेतातील बांध घालणे, गवताची वेचणी करून ती जाळणे, शेणखत व गाडीखत मिसळणे, नांगरणी, रोटाव्हेरटने मशागत करणे आदी विविध कामांची तयारी केली जाते. मात्र, सध्या शिवारात पाणीच पाणी असल्याने या साऱ्या कामांवर पाणी फिरले आहे. अनेक ठिकाणी मशागतीसाठी शेतात बैलही घालता येत नाहीत. काही शेतकऱ्यांची रब्बी पिकांची काढणी पूर्ण झालेली नसताना पावसाने ती कामेही थांबवली आहेत.
डोंगराळ आणि पावसावर अवलंबून असलेल्या शाहूवाडी तालुक्यात बागायती शेतीला अनुकूल परिस्थिती नाही. येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्याकडे सिंचनाची साधनेही मर्यादित आहेत. त्यामुळे पावसाचा विसंवाद त्यांच्या उपजीविकेलाच थेट आव्हान ठरतो. यंदा पावसाने आधी काढणीवर आणि आता पेरणीवर घाला घातल्याने शेतीचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे.
शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, शेतीच्या इनपुट खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, बियाणे आणि खते महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या मेहनतीने उत्पादन घेतले, तरी नफा मिळणे तर दूरच, शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागत आहे. गेल्या हंगामात भात काढणीच्या काळात पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्यात आता यंदाची पेरणीच वेळेत होणार की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.
गावात रोजगाराच्या संधी नसल्याने अनेक कुटुंबांमधील तरुण मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये मजुरीसाठी गेले आहेत. गावात उरले आहेत ते वृद्ध आणि काही तरुण शेतकरी, जे शेतीच्या आधाराने जगत आहेत. पण त्यांनाही आता नैसर्गिक संकटांमुळे शेतीवरचा विश्वास उडताना दिसतो आहे.
"राजाने मारले आणि पावसाने झोडपले" अशा अवस्थेला आलेल्या शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस मदत शासनाकडून मिळत नाही. नैसर्गिक आपत्ती फंडातून तत्काळ मदत मिळावी, विम्याच्या दाव्याची कार्यवाही व्हावी आणि शेतीच्या बांधावरच समाधान मानणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा किरण दिसावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.