Gaur Attack Farmer Injured Shahuwadi
बांबवडे : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शिराळे वारुण पैकी पार्टेवाडी येथील शेतकरी शिवाजी मारुती चिंचोलकर (वय 45 ) यांच्यावर गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटात गव्याचे शिंग घुसले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागून असणाऱ्या परिसरातील गावांमध्ये उद्यानातील हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच गावातील मयूर यादव या तरुणावर गव्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आज सकाळी ११ च्या सुमारास शिवाजी चिंचोलकर आपल्या शेताकडे गेले होते. या वेळी झुडपाआड उभा असलेल्या गव्याने धडक मारून गंभीर जखमी केले. ही धडक एवढी भीषण होती की गवारेड्यांची शिगे चिचोलकर यांच्या पोटात ८ ते १० सेंटीमीटर इतकी खोल गेली.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर वारूण येथे दिली त्यावेळी तेथील वैध्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आणि प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.