Kolhapur Savarwadi road work issue
शिरोली दुमाला : रस्त्याची अपुरी कामे, खड्डे, चिखल, धूळ, वारंवार घडणारे अपघात यामुळे करवीरच्या पश्चिम भागातील वाहनचालक वैतागून गेले आहेत. त्यातच बुधवारी (दि.१०) सकाळी १० वाजता सावरवाडी (ता.करवीर) येथील ओढ्याजवळील रस्त्यावर चारचाकी वाहने पुढे जाण्यास अडथळा आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे जमलेल्या संतप्त ग्रामस्थ व वाहनचालकांनी रस्त्यावर उतरून कामाच्या विरोधात निषेध व्यक्त करत संबंधित सुपरवायझरला चांगलेच धारेवर धरले.
करवीरच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या कोल्हापूर - बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गासाठी रस्त्याची कामे गेली आठ - नऊ महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र या कामात सुसूत्रता, नियोजनाचा व दर्जेदार कामाचा अभाव असल्यामुळे कामे रेंगाळत सुरू आहेत. याचा या मार्गावरील प्रवाशी, ग्रामस्थ व वाहनचालकाना प्रचंड त्रास होत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सूचना बेदखल करून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करत कंपनीचा निषेध केला. तासाभरात वाहतूक सुरळीत करण्यात आली.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, माधव पाटील, कुंभी कारखान्याचे संचालक दादासो लाड, माजी पोलिस पाटील गजानन खोत आदींनी तीव्र शब्दात सुपरवायझरला सुनावले. यावेळी सावरवाडी सरपंच शंकर जाधव, शिरोली दुमाला सरपंच सचिन पाटील, एस. के. पाटील, बाबुराव जाधव कॉन्ट्रॅक्टर, युवराज भोगम, कृष्णात मांगोरे, आदीसह या परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ, वाहनचालक उपस्थित होते.
शनिवारी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसोबत बैठक
संबंधित रचना कॅन्स्ट्रक्शन कंपनीचा मनमानी व अरेरावीचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर वीरेंद्र बिर्ला यांना शनिवारी या परिसरातील ग्रामस्थांसोबत सावरवाडी फाट्यावर बैठकीला बोलविण्याबाबत नंदकुमार पाटील, माधव पाटील यांनी सुपरवाझरला सुनावले. जर कामात सुधारणा नाही झाली, सकारात्मकता बदल नाही दिसला तर मात्र तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.