Kolhapur Ratnagiri Highway Car Truck Crash Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Accident | कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर ट्रक-कारची भीषण धडक; साताऱ्याचे कदम कुटुंब अपघातात जखमी

साताऱ्याहून गणपतीपुळ्याकडे पर्यटनासाठी जाताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Ratnagiri Highway Car Truck Crash

विशाळगड : साताऱ्याहून गणपतीपुळ्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या कदम कुटुंबाच्या कारला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथे भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले असून, ट्रक चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत कदम हे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी साताऱ्याहून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास वारूळ फाट्याजवळ समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकशी त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील चालक श्रीकांत पांडुरंग कदम (वय ४४), ​ज्योती श्रीकांत कदम (वय ३८), पांडुरंग चिमाजी कदम (वय ६५), शारदा पांडुरंग कदम (वय ६०), ​स्वरा श्रीकांत कदम (वय १४) हे पाच एकाच कुटूंबातील सदस्य आणि सुधीर नारायण वाघडे (वय ४० वर्षे, सर्व रा. सातारा) जखमी झाले आहेत. ​यापैकी श्रीकांत कदम आणि ज्योती कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोठा अनर्थ टळला:

समोरून कार येत असल्याचे पाहताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून आपले वाहन उजव्या बाजूच्या डिव्हायडरवर चढवले. ट्रक चालकाच्या या तत्परतेमुळे कार ट्रकच्या पूर्णपणे खाली दबली गेली नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

महामार्गाचे काम की मृत्यूचा सापळा?

​कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत घटनास्थळी संताप व्यक्त करण्यात येत होता. वारूळ परिसरात अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. अपूर्ण काम, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि अरुंद रस्ते यामुळे येथे वारंवार अपघात होत असून, हे रेंगाळलेले कामच अपघातांना आमंत्रण देत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली होती. प्रशासनाने आणखी किती बळींची प्रतीक्षा करावी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT