कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटातील दरीत कोसळलेली बस  Pudhari
कोल्हापूर

Amba Ghat Bus Accident | नेपाळी बाग मजुरांची बस आंबा घाटात ८० फूट खोल दरीत कोसळली; २४ जण जखमी

Kolhapur Ratnagiri Highway | बस झाडीत अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

Bus falls into gorge Amba Ghat

विशाळगड : दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. नेपाळी बाग कामगारांना घेऊन कोकणात निघालेली खासगी बस शुक्रवारी (दि.५) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील एका चक्री वळणावर संरक्षक कठडा तोडून तब्बल ८० फूट खोल दरीत कोसळली.

सुदैवाने, दरीतील झाडीत ही बस अडकल्याने गाडीतील सर्व ११५ प्रवासी बचावले. या अपघातात २४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील बाग कामगारांना घेऊन खासगी बस (एमपी.१३.पी. १३७) मध्यरात्री मध्यप्रदेशमधून कोल्हापूरमार्गे रत्नागिरीकडे निघाली होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट, म्हणजेच सुमारे ११५ प्रवासी भरले होते (बसची आसन क्षमता ६० असताना).

चालकाला लागली झोप

​आंबा घाटातून प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने गाडीवरील ताबा सुटला. बसने संरक्षक कठडा तोडला आणि ती थेट ८० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. दरीत बस कोसळताच एकच गोंधळ उडाला. मात्र, दरीतील दाट झाडीमुळे बस अडकली आणि ती खाली खोलवर जाण्यापासून वाचली.

​या अपघातात काही प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिस तसेच आंब्यातील तरुणांचे मदत पथक तासाभरात घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रस्त्यावर काढले. सुमारे २४ जखमींना साखरपा येथील प्राथमिक रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​या बचावकार्यात आंब्यातील भाई पाटील, दिनेश कांबळे, दिग्वीजय गुरव, दिपक भोसले, तुषार पाटील या तरुणांनी मोलाची मदत केली. साखरपा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी वाहतूक केल्याबद्दल बसमालकावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT