Kolhapur Rains
कोल्हापूरसह घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.१९ ऑगस्ट) सकाळी ७ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३४.०९ फुटांवर होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. तर जिल्ह्यातील ६५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दस्तुरी चौक, कळे येथे बॅरिकेट लावण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर - राजापूर हा राज्य मार्ग बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आल्यामुळे बंद झाला आहे.
आज सकाळी अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला आहे. आज दुपारपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
भुदरगड तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. पाचवडे गावात कालवा भरून वरून पाणी वाहत आहे. यामुळे पंचसदस्य उदय देसाई यांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका आहे. येथील कालव्याजवळ असलेल्या इतर घरांनाही धोका निर्माण झाला आहे.