Kolhapur Rain Update
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पण धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पंचगंगा नदीने आज पहाटे इशारा पातळी ओलांडली. दुपारी १ वाजता पंचगंगा नदीची राजाराज बंधारा पाणी पातळी ४० फूट ५ इंचावर होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट समजली जाते. जिल्ह्यातील एकूण ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे धरणाच्या एकूण स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले आहेत. सध्या ३, ६ आणि ७ क्रमाकाचे दरवाजे खुले आहेत.
धरणांतून होत असलेला विसर्ग
राधानगरी - ५,७८४ क्युसेक
दूधगंगा - २५ हजार क्युसेक
वारणा - ३४,२५७ क्युसेक
कोयना - ९५,३०० क्युसेक
अलमट्टी - २,५०००० क्युसेक
हिप्परगी - ८२,८०० क्युसेक
कोल्हापूर -गारगोटी मार्गावर कूर, मडिलगे जवळील रस्त्यावर वेदगंगा नदीचे पाणी आले आहे. यामुळे येथून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने आज कोल्हापूर घाट श्रेत्रासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर जिल्ह्यातील इतर भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.