

जयसिंगपूर : धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. अलमट्टी धरणात सध्या 112.78 टीएमसी साठा आहे. 88 हजार क्युसेक आवक होत असून 26 दरवाजातून 1 लाख 75 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, हिप्परगीत (ता. जमखंडी) 75 हजार क्युसेक आवक होत असून अलमट्टी धरणाकडे 75 हजार क्युसेक पाणी जात आहे. हिप्परगी बॅरेंजचे 22 दरवाजे खुले करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढला तर कोल्हापूर, सांगलीला महापुराची भीती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, कासारी, तुळशी, भोगावती, हिरण्यकेशी तर सांगली जिल्ह्यातील वारणा, कृष्णा, येरळा सातारा जिल्ह्यातील कोयना, कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात महापुराचा फटका बसल्याचे चित्र आहे. सध्या ऑगस्टच्या मध्यावर धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महापूर येतो की काय, अशी धास्ती आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवून महापूर रोखण्यासाठी नियोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाने अलमट्टी व हिप्परगी धरणावर पाण्याची आवक-जावकवर देखरेख ठेवून अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. सध्या अलमट्टी धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. शिवाय धरणामध्ये आवक व जावक यावर पाटबंधार्याचे अधिकारी लक्ष ठेवून राहिले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आजअखेर सुमारे 1 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. जुलै अखेर 18.10 हेक्टरमधील जिरायत पिकांचे तर 334.13 हेक्टर मधील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आतापर्यंत सुमारे 55 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये 59 लाखांचे नुकसान झाल्याचा प्रशासनचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात सुमारे 1 कोटीवर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतात पाणी शिरू लागले आहे. यामुळे पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत 66 अशंत कच्च्या घरांची पडझड झाली तर एक मोठ्या दुधाळ जनावारांचा मृत्यू झाला आहे.