दत्तवाड : दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीचे पाणी गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे पात्राबाहेर पडले आहे. पाणी नदीकाठच्या गवताच्या कुरणात शिरू लागले आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पाच-सहा दिवसापूर्वीच या नदीवरील दत्तवाड एकसंबा व दत्तवाड मलिकवाड ही दोन्ही बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी महाराष्ट्र कर्नाटकातील वाहतूक ठप्प झाली आहे. पाणी पातळीत वाढ सुरूच असून गवताच्या कुरणात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे चांगले आलेले गवत कापण्यासाठी शेतकरी वर्ग व पशुपालकांची धावपळ सुरू आहे. नदीकाठच्या पाण्याच्या मोटारी शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी काढून ठेवल्या आहेत. नदीच्या पाणी पातळीत अशीच वाढ सुरू राहिल्यास थोड्याच कालावधीत येथील स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता आहे.