Radhanagari Paddy Crop Loss
म्हासुर्ली : भातपिके पोटरीला, गळ्यात येण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिल्याने राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावल्यानंतर अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, गावात पाऊस आणि शिवारात कोरडेपणा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दमदार पावसाअभावी पिके कोमेजू लागली असून, आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास डोंगर उतारावरील भातशेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाळ्याला उशिराने सुरुवात झाल्याने खरिपाची लागवडही विलंबाने झाली. मात्र, सुरुवातीपासून पावसात सातत्य राहिल्याने पिकांची वाढ चांगली झाली. डोंगरमाथ्यावरील पिकेदेखील जोमाने वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा पावसाने साथ दिल्याने पिके तरारली. मात्र, ऐन भरणीच्या काळातच पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र असून, आकाशात ढगांची दाटी होत असली तरी पावसाची हुलकावणी कायम आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.
राधानगरी तालुक्याचा पश्चिम भाग डोंगर उतारावर विखुरलेला असल्याने येथे मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यात भाताला प्रमुख स्थान आहे. चिखलगुठ्ठा पद्धतीने केलेल्या रोपलागणीसाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षांत पावसाचे सातत्य कमी होत असल्याने येथील खरीप शेतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यंदा मात्र सुरुवातीच्या काळात पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
सध्या नदीकाठच्या भागातील भातपिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्युत पंप सुरू केले आहेत. मात्र, डोंगर उतारावरील शेतीसाठी सिंचनाचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास या भागातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
प्रतिकूल परिस्थितीत पिकांची लागवड करण्यापासून ती वाचवण्यापर्यंतची कसरत शेतकऱ्यांना दरवर्षी करावी लागते. यंदा पिके चांगली आली असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. आता भातपिकांच्या भरणीच्या काळात दमदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.